औरंगाबाद – मराठा समाजाच्या आरक्षणाचा न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील यांनी मराठा समाजाला जाहीर झालेल्या आरक्षणाने आनंद झाला असल्याचे म्हटले आहे. आज जाहीर झालेले आरक्षण ४२ हुतात्मांना अभिवादन असून महाराष्ट्रात निघालेल्या शिस्तबद्ध मुकमोर्चांचे हे यश असल्याचे विनोद पाटील म्हणाले.
मराठा क्रांती मुक मोर्चाची सुरुवात
औरंगाबादमधून झाली होती. त्यासोबतच मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देखील लढवला
गेला. हा न्यायालयीन लढा लढवणारे विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाचे स्वागत केले
आहे. ते म्हणाले, ‘मराठा समाजाला
आरक्षण मिळावे यासाठी राज्यात ४२ जणांनी हौतात्म्य पत्करले. आज जाहीर झालेले
आरक्षण हे या हुतात्म्यांना अभिवादन आहे.’
मराठा क्रांती मोर्चामध्ये महत्त्वाची भूमिका
असलेले विनोद पाटील म्हणाले, मराठा समाजाने राज्यात शांततेत आणि शिस्तबद्ध मोर्चे
काढले आणि आरक्षणाचा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचवला. या सर्व मोर्चांचे हे यश असल्याचे पाटील म्हणाले.
मराठा
आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकण्यासाठी विनोद पाटील यांनी अनेक पुरावे
न्यायालयात सादर केले होते. आज तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला सामाजिक आणि
आर्थिक मागास (एसईबीसी) अंतर्गत १६ टक्के आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मांडण्यात
आले आणि ते एकमताने मंजूर झाले. आता राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचे
कायद्यात रुपांतर होणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विनोद पाटील यांनी सरकार,
न्यायालय आणि शिस्तीचे प्रदर्शन करणाऱ्या मराठा बांधवांचे आभार मानले.












